*विद्यार्थ्यांच्या चित्ताकर्षक प्रात्यक्षिकांनी संपन्न झाला माटरगाव येथील सुसंस्कार शिबिराचा समारोप* खामगाव प्रतिनिधी: संस्कार महर्षी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचे प्रेरणेने पंधरा वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यात दिनांक 3 मे ते 14 मे पर्यंत माटरगाव येथे वय वर्ष 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार निवासी शिबिर आयोजित केल्या जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा महालक्ष्मी कृषी विद्यालय माटरगाव या ठिकाणी दिनांक 3 मे ते 14मे पर्यंत सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. यावर्षी या शिबिरात 77 मुला-मुलींनी प्रवेश घेतला होता. या शिबिरात सहभागी मुलांना आदर्श दिनचर्या, भारतीय संस्कृती, भजन संगीत, बौद्धिक, व्यायाम या मुख्य विषयांतर्गत राष्ट्रधर्म जागृतीच्या दृष्टीने संस्कार केले जातात. देश धर्म व संस्कृती संवर्धनार्थ आयोजित या संस्कार सोहळ्याचा समारोप दिनांक 14 मे रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या चित्ताकर्षक प्रात्यक्षिकांनी रंगला. समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी महालक्ष्मी कृषी विद्यालयाचे अध्यक्ष अनंतराव आळशी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार एडवोकेट आकाश दादा फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, राष्ट्रधर्म युवा मंचचे डॉ. मनोज महाराज चौबे, शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, माजी अर्थ व बांधकाम सभापती सुरेश वनारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देवचे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान भाऊ भोजने,जुगल किशोर गांधी, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाष पेसोडे उपस्थित होते. संध्याकाळच्या नयनरम्य वातावरणात सामुदायिक प्रार्थनेने या समारोपीय सोहळ्याला सुरुवात झाली. व त्यानंतर सुसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी त्यांना शिबिरात शिकवलेले बौद्धिक, भजन,संगीत आणि लेझीम मल्लखांब लाठीकाठी व पावल्या यांच्या आकर्षक प्रदर्शनाने तब्बल साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना खीळवून ठेवले. तसेच विविध सामाजिक प्रश्नांना हात घालत विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणांनी श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले. याप्रसंगी आमदार एडवोकेट आकाश दादा फुंडकर यांनी सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी पालकांनी सुद्धा सुसंस्कृतपणे वागलं पाहिजेत असे प्रतिपादन केले व गुरुदेव सेवा मंडळ माटरगावच्या सातत्यपूर्ण चालत असलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले. तर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सुद्धा आपल्या मनोगतातुन संस्कृती रक्षणार्थ या सर्वांगीण सुसंस्कार शिबिराची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी विविध विषयांतर्गत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये लाठीकाठी विषयात महेश सायखेडे व वैष्णवी हिरळकार मल्लखांब मध्ये सोमेश लोड व चि. ओम लेझीम मध्ये शाश्वत खोडके व श्रीनिवास कसूरकर यांनी प्राविण्य मिळवले तर शिबिराचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून विठ्ठल वसंतराव जवळकर यांनी यावर्षी बाजी मारली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
byदिव्यांग शक्ती
-
0