*१ जून पासून पशुधनास 'बिल्ला' (बारा अंकी टॅग) बंधनकारक* खामगाव दि.७ :-सर्व गायवर्ग, म्हैसवर्ग शेळी व मेंढी इतर पशुधनास बिल्ला मारून घेणे (टॅगिंग) बंधनकारक करण्यात आले असून येत्या १ जून २०२४ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.कानातील बिल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही.त्यामुळे पशुपालकांना पशुधनास कानात बिल्ला मारून घेणे बंधनकारक झाले आहे. सर्व शेतकरी, पशुपालक बांधव यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणे आता शासनाने बंधनकारक केलेले आहे. कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत.नैसर्गिक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.कानात बिल्ला नसलेल्या पशुधनाची बाजार समिती, आठवडी बाजार व गावागावांतील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.त्यामुळे कानात बिल्ला नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीद्वारे घेण्यात येईल. पशुधनाची वाहतूक कानात बिल्ला असल्याशिवाय करता येणार नाही.तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील. ग्रामपंचायत मध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये.दाखल्यावर कानातील बिल्ला क्रमांक नमूद करण्यात यावा. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर नसल्यास केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानात बिल्ला मारलेला नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. त्यामुळे सर्व पशुपालकांनी पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घ्यावा,व सर्व पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यास सहकार्य करावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.बी.सोनोने पंचायत समिती,खामगांव यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0